Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
05
Nov

A02- या सिरीजचा आराखडा

नमस्कार, ‘चला शिकूया 3D Animation!’ सिरीजच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. या भागात मी तुम्हाला या संपूर्ण ट्रेनिंग सिरीजचा आराखडा समजावून सांगणार आहे. ही सिरीज प्रश्नोत्तराच्या किंवा संभाषणाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडली जाणार आहे. उपनिषदांमध्ये गहन विषय सोप्पे करून समजवण्यासाठी अशी पद्धत वापरलेली आढळते. त्याच्या प्रेरणेतून आपण प्रश्न विचारणारी एक ‘Q’ नावाची काल्पनिक व्यक्ती उभी करू आणि उत्तराच्या निमित्तानी आपल्या 3D animation विषयावर बोलू. तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटले तर ते अशा माध्यमातून मला नक्की विचारा. तर मग करायची सुरवात?

Q: मुळात ही सिरीज बनवण्यामागे तुमचा काय दृष्टीकोन आहे?

गेल्या १० ते १२ वर्षात, मला अनेक लोकांकडून, अॅनिमेशन क्षेत्राविषयी वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्यापैकी अनेक जण आपल्या मुला-मुलींसाठी करिअर म्हणून या क्षेत्राकडे बघत होते. तर इतर अनेक जण स्वतःच्या करिअरसाठी अॅनिमेशन क्षेत्राबद्दल माहिती विचारात होते. या सगळ्या प्रश्नांमध्ये मला ३ ठळक मुद्दे आढळले. ते असे-

सगळ्यात जास्त लोकांनी, मला या क्षेत्राची अधिक व्यापक आणि सविस्तर माहिती मिळू शकेल का, असं विचारलं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे- अशा प्रकारची माहिती कुठे फारशी उपलब्ध होत नाही, वर्तमानपत्रांमध्ये हल्ली येणारे बरेच लेख हे नुसतीच जाहिरातबाजी करणारे असतात, त्यातून मुलभुत ज्ञान मिळत नाही.

त्या खालोखाल बऱ्याच मंडळीनी या क्षेत्राचं व्यवस्थित आणि व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावं, अशी मागणी केली. मोठमोठ्या क्लासेसची फी खूप असते, आणि त्यामानानी तिथे उत्तम शिक्षण मिळतंच असं नाही. सध्या ज्या संस्था अॅनिमेशन प्रशिक्षण देतात, त्यातील सर्वच ठिकाणचे प्रशिक्षक स्वतः अनुभवी असतातच असं नाही.

तर इतर अनेक जणांनी Jobs मिळतील का? अशी मागणी केली. मला आलेल्या e-mail, पत्र, फोन्स इ. च्या संख्येवरून हे सगळेच प्रश्न खूप गंभीर आहेत असं वाटतं.

Q: मुद्दे तर खरंच गंभीर वाटतायत. मग तुम्ही यासाठी काय करायचं ठरवलंय?

नक्कीच, मी शक्य तेवढा प्रयत्न करायचं ठरवलंय. मी साधारण १९९९ सालपासून व्हिज्यूअलाइझेशन किंवा ग्राफिक्सशी निगडीत आहे. माझ्याकडे ज्या काही थोड्याफार कल्पना आहेत, त्यांच्या मार्फत या क्षेत्रात नवीन येणाऱ्यांसाठी नक्कीच काही करण्यासारखं आहे.

ज्यांनी या क्षेत्रात आधीच शिक्षण घेतलं आहे, अशांना या क्षेत्रात हल्ली अनेक jobs उपलब्ध होत आहेत. शिवाय हल्ली freelancing किंवा व्यवसाय करण्यासाठीही अनेक चांगले पर्याय उपलब्ध होत आहेत. चांगलं आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेतल्यावर मग career options बद्दल फार काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या ‘अद्वैत स्टुडीओज’ या कंपनीतही वेळोवेळी अनेक कुशल 3D Artists ची गरज असते, त्यामुळे इच्छुकांनी job applications नक्की पाठवावीत.(contact us)

मग मुख्य प्रश्न राहतो तो इतर दोन मुद्द्यांचा. अधिक सविस्तर माहिती आणि व्यावसाईक दर्जाच्या शिक्षणाचा. मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे, मी ही ट्रेनिंग सिरीज याच उद्देशाने आपल्यापुढे मांडत आहे. खरंतर काही कमर्शिअल कोर्सेस मार्फत मी 3D Animation ट्रेनिंग देतो, पण ही सिरीज नक्कीच पूर्णपणे फ्री असणार आहे. मला वाटतं की मुलभूत शिक्षण सगळ्यांना सहज उपलब्ध असावं. या सिरीजच्या माध्यमातनं animation ची संपूर्ण प्रक्रिया आपण उलगडून बघणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

Q: म्हणजे या सिरीजमुळे, या क्षेत्राकडे मी करिअर म्हणून वळावं की नाही हा निर्णय करता येईल का?

नक्कीच, मी माझ्याकडून शक्य तितक्या सोप्या पद्धतीनी माहिती देईन. या सिरीजमुळे तुमच्या डोळ्यासमोर या क्षेत्राचा एकूण आराखडा उभा राहील. प्रत्यक्ष animation केल्यामुळे तुम्हाला अनेक मुलभुत गोष्टी माहित होतील. या सगळ्यामुळे हे क्षेत्रं तुमच्यासाठी करीअर म्हणून योग्य आहे की नाही हे तुम्हीसुद्धा सहज सांगू शकाल.

Q: अरे वा! हां, आराखड्या-वरनं आठवलं, तुम्ही या सिरीजच्या आराखडा सांगणार होता ना?

हो. या सिरीजचे आपण तीन मुख्य भाग पाडू. ज्यांना आपण व्हॉल्यूम (Volume) म्हणू. आणि या प्रत्येकात, अनेक लेखांमार्फत आपण गप्पा मारू आणि एकमेकांशी संवाद साधू.

Volume 1 मध्ये, म्हणजे या चालू Volume मध्ये आपण 3D computer graphics ची ओळख करून घेणार आहोत. यातील काही भागात आपण कॉम्प्यूटर ग्राफिक्स कुठं आणि कसं वापरलं जातं ते बघणार आहोत. ही technology वापरण्याच्या आणि project हाताळण्याच्या काही मुलभुत पद्धती बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपण Animation या संपूर्ण क्षेत्राचा आणि पध्दतीचा आढावा घेणार आहोत.

Volume 2 मध्ये आपण आपल्या शॉर्ट फिल्म बद्दल गप्पा मारणार आहोत. आपली अॅनिमेशन फिल्म कशी बनवता येईल याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. यासाठी लागणाऱ्या software ची आणि इतर अनेक बाबींची, आपण ओळख करून घेणार आहोत. शिवाय त्या अनुशंगानी काही मुलभुत संकल्पना समजावून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष animated short film बनवणं सोपं जाईल.

Volume 3 मध्ये आपण प्रत्यक्ष आपली फिल्म बनवणार आहोत. त्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही त्या स्वतः करून बघू शकाल आणि शिकत शिकत शेवटी तुमच्याकडे तयार असेल तुम्ही स्वतः केलेली एक छानशी छोटी अॅनिमेशन फिल्म.

Q: हे खरंच एकदम इंटरेस्टिंग वाटतंय.

हे तीनही volumes पूर्णपणे मोफत असणार आहेत. अनेक गोष्टी तुम्हाला Download करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. शिवाय ही सिरीज बघताना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही शंका असतील तर त्यासाठी प्रत्येक लेखाच्या खाली खास Reply चा भाग असेल. अशा पद्धतीनी या तीनही volumes मधून आपण खूप प्रमाणात मुलभुत तंत्रज्ञान माहित करून घेणार आहोत. आणि खूप धमाल करणार आहोत. तेंव्हा पुढचे सगळे भाग बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

11 comments

 1. very good exercise.

 2. प्रत्येक भागासोबत उत्सुकता वाढत आहे……

 3. very nice sir…..

 4. Thanks sir,

  Sir, mala download karnysathi link send
  Kara please

 5. Bharat, Nakki kay download karaycha the?
  Blender.org war blender download karta yeil.

Pingbacks

 1. प्रस्तावना | Advaita Studios
 2. अॅनिमेशन म्हणजे नक्की काय? | Advaita Studios
 3. अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Post-Production | Advaita Studios