Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
12
Nov

A03- अॅनिमेशन म्हणजे नक्की काय?

अॅनिमेशन हा या संपूर्ण सिरीजचा मुख्य विषय असल्यामुळे, नक्कीच आपण यावर खूप गप्पा मारणार आहोत.

Q: बरोबर, पण हे animation नक्की असतं तरी काय?

व्याख्याच सांगायची झाली तर- ‘गतीचा वापर करून निर्जीव आकृत्यांना जिवंतपणा आल्याचा आभास निर्माण करणे’ म्हणजे अॅनिमेशन. ‘जिवंतपणा आणण्याची प्रक्रिया’ अशा अर्थाच्या एका Latin शब्दावरून हा शब्द रूढ झालाय. फिल्ममध्येही याच जिवंतपणाचा आभास आणला जातो. तुम्हाला माहीतच असेल, की फिल्ममध्ये एका लांब पट्टीवर अनेक सलग चित्रं असतात. जेंव्हा आपण प्रोजेक्टर सारख्या माध्यमातून ती चित्रं सलग बघतो तेंव्हा आपल्याला हालचालीचा आभास होतो. म्हणून तर फिल्मला ‘मूव्ही’ म्हणतात.

पण व्याख्येत अडकण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष अॅनिमेशनच करून बघूया ना!

Q: खरंच?

का नाही? हे बघा…

Ball-1a1frameWeb200

वरच्या चित्रात, एक गोल आणि एक लाईन वापरून, जमिनीवर बॉल ठेवलेला आहे असं दाखवलंय. आता असं समजू, की आपल्याला, या बॉलला उड्या मारताना दाखवायचंय. याचं अॅनिमेशन करण्यासाठी आपल्याला आणखी काही पानांवर अशीच चित्रं काढायची आहेत. बॉल उडी मारणार असल्यामुळे दुसऱ्या चित्रात तो आधीपेक्षा थोडा उंच काढू. आणि तिसऱ्या पानावर तो सर्वात उंच काढावा लागेल.
Ball-1a3framesWeb200आता इथून पुढे त्याची उडी संपून तो खाली यायला सुरवात होईल. त्यामुळे, पुढच्या पानावर तो खाली आलेला दिसेल आणि शेवटी पाचव्या पानावर बॉल पुन्हा जमिनीला टेकेल. आता ही आपली पाच पानं तयार झाली.

Ball-1a5framesWeb200

आता असंच जर आपण आणखी एका म्हणजे सहाव्या पानावर चित्र काढलं आणि त्याच्यात तो बॉल थोडा खाली दाबला गेलेला दाखवला तर?
Ball-1a6framesWeb200

तसं बघायला गेलं तर ही पाच वेगवेगळी पानं आहेत आणि त्यावर आपण वेगवेगळे गोल काढले आहेत. आणि अर्थातच त्यातला कुठलाही बॉल काही खराखुरा जिवंत नाही किंवा तो उड्याही मारत नाहीये. पण आता हीच सहा चित्र आपण थोडी पटापट डोळ्यापुढून सरकवली तर? तर बघा काय जादू होते ती.

.

.

.

.

.

.

Ball-1c6fastWeb200

Q: ओ, असं वाटतंय की जणू तो बॉल उद्या मारतोय.

जणू सहा नाहीत ते एकंच चित्रं आहे. वाटतंय ना?
आणि जर आपण ६ ऐवजी १२ चित्रं काढली तर?
Ball-2aWeb200

आता ते आणखी छान दिसतंय. खरं तर आता आपल्याला वेगवेगळ्या चित्रातला फरक अजिबात समजत नाहीये. १२ वेगवेगळे बॉल सुद्धा समजत नाहीयेत. आपण एकंच बॉल उद्या मारताना बघतोय. हो ना? हेच तर animation आहे. हो, आत्ता आपण चक्क animation केलं.

Q: मला कधीच वाटलं नव्हतं की हे इतकं सोपं असेल.

अशा प्रकारे क्रमाक्रमाने फरक होत जाणाऱ्या अनेक चित्रांची मालिका सलग आणि जोरात बघितली तर त्यात जिवंतपणा आल्याचा भास निर्माण होतो. असं वाटतं की ती चित्रं खरोखरंच हालतायत. चित्रं जोरात बदलल्यामुळे आपल्या डोळ्यांना प्रत्येक वेगवेगळ्या चित्रातला फरक कळेनासा होतो, आणि आपल्याला एकंच चित्रं असल्याचा भास होतो. अशीच आणखी चित्रं काढत गेलो तर आपण बॉलला उजवीकडे-डावीकडे उड्या मारताना दाखवू शकतो.

Ball-3aWeb200

तो बॉल खूप हलका आहे असं दाखवू शकतो,
Ball-4a-lightWeb200

किंवा खूप जड.

Ball-5a-heavyWeb200किंवा असे आणखी अनेक बॉल आहेत असंही दाखवू शकतो.
Ball-6a-rainWeb200

अशी अनेक चित्रं वहीच्या पानावर कोपऱ्यात काढून, ती चिमटीत धरून पटापट फ्लिप केली की छान अॅनिमेशन होतं. याला फ्लिप-बुक (Flip-book) अॅनिमेशन म्हणतात. ‘तारे जमीन पर’ मधलं ईशाननी केलेलं फ्लिप-बुक आठवतंय का? तुम्हीही अशी छान फ्लिप-बुक अॅनिमेशन नक्की करून बघा. तुम्हाला नक्की मजा येईल.

Q: मला आता खूपच मजा येतीये. हे खूप इंटरेस्टिंग आहे, मी नक्की करून बघीन.

अशा एकेका सलग पानावर चित्र काढून आपण अॅनिमेशन तयार केलं. अॅनिमेशनच्या भाषेत अशा प्रत्येक पानाला फ्रेम म्हणतात. आणि या प्रकाराला म्हणतात फ्रेम बाय फ्रेम अॅनिमेशन (frame by frame animation).

Q: ‘फ्रेम बाय फ्रेम’, OK…

हे अॅनिमेशन करण्यासाठी आपल्याला वहीच्या प्रत्येक पानावर सलग बॉलची चित्रं काढावी लागली. तेही क्रमाक्रमाने जागेत फरक करत. अर्थात आपण पानं थोडीच वापरली. आणि या उदाहरणात आपण नुसतं एका बॉलचं अॅनिमेशन केलं. आता असं डोळ्यासमोर आणा की समजा त्या बॉलच्या ऐवजी टॉम आणि जेरी सारखं कार्टून काढायचं असेल तर? तर? हो बरोबर ओळखलंत! तर आपल्याला खूप पानं भरवावी लागतील. …. किंवा एखादा Table lamp उड्या मारतोय असं दाखवायचं असेल तर?

Ball-7a-tinguWeb200

आणि अशी संपूर्ण फिल्म?

Q: अरे बाप रे! फारच अवघड आहे! म्हणजे खूपच चित्रं काढायला लागतील… हो ना?

घाबरलात की काय? …पण पूर्वीपासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत अशाच प्रकारे फ्रेम बाय फ्रेम अॅनिमेशन केलं जात असे. न कंटाळता! अजूनही बऱ्याचदा हीच पद्धत वापरली जाते. ही पद्धत म्हणजे अॅनिमेशनचा उगम आहे असं म्हणता येईल.

याला अर्थातच प्रचंड धैर्य आणि चिकाटी असावी लागते. एका सेकंदाच्या फिल्मसाठी अशी किमान १५ ते २० तरी चित्रं काढावी लागतात. म्हणजे एका मिनिटाच्या फिल्मसाठी ६० सेकंद x २० = १,२०० चित्रं लागतील. आणि एका तासाच्या फिल्मसाठी ६० मिनिटे x १,२०० = ७२,००० चित्रं लागतील. हो चक्क ७२,००० चित्रं.

Q: ब..हा..त्त..र   ह..जा..र..?

तुम्ही म्हणाल की मी तुमच्याशी अॅनिमेशनविषयी गप्पा मारतोय की तुम्हाला घाबरवतोय? पण खरंच, एवढी चित्रं काढणं सोपं नक्कीच नाहीये. हे काम नक्कीच त्रासदायक, वेळखाऊ आणि त्यामुळे कंटाळवाणं होऊ शकतं. शिवाय प्रत्येकवेळी कंटाळा हा विषय नसतो, बऱ्याचदा कामातली अचूकता सर्वचजण शेवटपर्यंत सांभाळू शकतात असं नाही. त्यामुळेच जगभरात अॅनिमेशनच्या पद्धतीमध्ये हळूहळू संशोधन होऊ लागलं. आपलं काम अधिकाधिक सोपं आणि अचूक कशा प्रकारे होऊ शकेल यावर प्रयोग केले गेले.

अशातच कॉम्प्युटरचा वापर अॅनिमेशनसाठी होऊ लागला… आणि खूप मोठी क्रांती झाली.

Computer-old_01

Q: हां, आता कसं!

Animation च्या कामात कॉम्प्युटरला समाविष्ट करून घेणं खूपच क्रांतिकारी ठरलं. कंप्युटर-सारखा मदतीचा हात असणं म्हणजे कलाकारांसाठी एकदम जादूची कांडीच ठरली. अॅनिमेशनमधे आपल्या वरच्या उदाहरणात आपण बॉल ची 12 चित्रं काढली. तुम्हाला काय वाटतं, समजा हेच काम कॉम्प्युटर-मार्फत करायचं झालं तर ते कसं झालं असतं?

Q: मला वाटतं… अं… ते… ~ … अं, नाही सांगता येत!

यात आपण सर्वात पहिल्या पानावर बॉल काढायचा. पुढची पानं सोडून थेट ६व्या पानावर बॉल वर असतानाचं चित्रं काढायचं आणि शेवटी १२व्या पानावर बॉल खाली असलेला काढायचा. आता कॉम्प्युटर मधल्या पानांच्या संख्येवरून आणि या दोन चित्रातल्या फरकावरून क्रमाक्रमाने सगळ्या पानांवर चित्रं काढतो. समजा आपल्याला तो बॉल इकडे तिकडे उड्या मारताना दाखवायचाय, तर मधली-मधली उडीच्या वेळेसची मुख्य चित्रं आपण काढायची. उरलेली चित्रं कॉम्प्युटर काढेल.

Q: हे तर फारच भन्नाट आहे!

म्हणजे ७२,००० हे आता ब..हा..त्त..र   ह..जा..र.. नाही वाटणार. आहे कि नाही गंमत!
ही तर सुरवात आहे, पुढेपुढे तर आपण आणखी खूप धमाल करणार आहोत.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

7 comments

  1. Very interesting !

  2. Aata thode thode samajayala lagale ahe

  3. kharach khup sopya bhashet lihila ahe. lagech samajtay.

  4. Mala changle samjyla lagle.Aani khupch changlya bhashet samjavle ahe

Pingbacks

  1. कॉम्प्यूटर अॅनिमेशन | Advaita Studios
  2. A02- या सिरीजचा आराखडा | Advaita Studios
  3. B08- ब्लेंडर मधील Animation | Advaita Studios