Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
03
Dec

A06- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Pre-Production

अॅनिमेशन सॉफ्टवेअर्सचा वापर कुठे आणि कसा केला जाऊ शकतो हे आपण मागच्या भागात पाहिलं. एखादा ग्राफिक्स किंवा अॅनिमेशन प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण व्हावा यासाठी काही पद्धती विकसित झाल्या आहेत. वर्षानुवर्षे त्यात सुधारणा होत आल्या आहेत. आपण आता त्या पद्धतीची थोडक्यात ओळख करून घेऊ. प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्याच्या अशा पद्धतीला प्रोजेक्ट एक्झिक्युशन पाईपलाईन (Project Execution Pipeline) म्हणतात. एखादी अॅनिमेशन फिल्म, एखाद्या इमारतीचा walk-through किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही प्रोजेक्टसाठी या पद्धतीचा वापर होऊ शकतो.

Q: या पद्धतीचा आपल्यालाही उपयोग होईल का?

नक्कीच, आपणही पुढे एक लहानशी अॅनिमेशन फिल्म बनवणार आहोत, त्यामुळे या एक्झिक्युशन पाईपलाईन बद्दल जाणून घ्यायला तुम्हालाही आवडेल.

Project Execution Pipeline: आपला प्रोजेक्ट सुरु करण्यापासून सर्वात शेवटचे आउटपुट हाती येई पर्यंत, अनेक बाबींचा विचार या पाईपलाईनच्या माध्यमातून केला जातो. ढोबळ मानाने या पद्धतीचे तीन टप्पे पडतात. ते म्हणजे:
 A. Pre-Production, B. Production आणि C. Post-Production.

Project-Pipeline-PipeA-926D

या भागात आपण प्री-प्रोडक्शनची माहिती घेऊया.

A. Pre-Production (प्री-प्रोडक्शन): तुम्हा सगळ्यांना सहलीला जायला नक्कीच आवडत असेल, नाही का? समजा आपल्याला अशा एखाद्या लांबच्या सहलीला जायचंय, अशावेळी आपण काय करतो. प्रथम आपण सहलीचं ठिकाण ठरवतो, बरोबर? त्यानंतर तिथं जायचं कसं, म्हणजे स्वतःच्या गाडीनं की बसनं की ट्रेननं ई. गोष्टी ठरवतो. त्या जागेचा एखादा नकाशा असेल तर तो बघतो. तेथील राहण्याची, जेवणाखाण्याच्या व्यवस्थेची आधीच चौकशी करून ठेवतो. कोणकोणतं समान बरोबर घ्यायचं त्याचा विचार करतो. म्हणजेच थोडक्यात प्रत्यक्ष सहलीला जाण्याआधी तिची पूर्वतयारी करतो, जेणेकरून सहलीला जाताना किंवा गेल्यावर आपली गैरसोय होऊ नये. अगदी अशाच प्रकारे कॉम्पुटर ग्राफिक्सचा एखादा प्रोजेक्ट, उदाहरणार्थ एखादी शॉर्ट-फिल्म, तयार करण्याचं ठरवल्यानंतर त्याची पूर्वतयारी करणे म्हणजेच त्याचे प्री-प्रोडक्शन.

नावाप्रमाणेच प्रत्यक्ष काम सुरु करण्याआधीच संपूर्ण कामाचा आढावा घेणं, क्रम ठरवणं, आराखडे बनवणं ई. गोष्टी या गटात मोडतात. यातील बहुतांश बाबी वैचारिक किंवा brainstorming असतात. प्री-प्रोडक्शन समजून घेण्यासाठी आपण त्याचेही तीन भाग पाडू. Dream / Draft / Design. आपल्या संपूर्ण प्रोजेक्टचं काल्पनिक चित्रं डोळ्यासमोर आणायचं आणि त्याची संकल्पना तयार करायची, हे पहिल्या टप्प्यात होतं.  नंतर ती संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीनी आपल्या संपूर्ण टीमला समजावून सांगितली जाते. आणि मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचं सगळं नियोजन किंवा डिझाईन केलं जातं.

Dream:  समजा आपण एखादा चित्रपट किंवा लघुपट (Short film) बनवणार असू तर त्याची कथा, संकल्पना ठरवणं, विषय निश्चित करणं, उद्देश ठरवणं ई गोष्टींचा विचार केला जातो. आपला चित्रपट मनातल्यामनात डोळ्यासमोर आणला जातो. यासाठीच लहानपणी ऐकलेल्या चिऊकाउंच्या गोष्टींची किंवा व्हिजुअलाईझेशन ची मदत होते. आपल्या चित्रपटाचा विषय आणि आशय कोणकोणत्या प्रकारे लोकांसमोर मांडता येईल, याचं कल्पनाचित्र उभं केलं जातं. थोडक्यात तो चित्रपट तयार होण्याच्या आधीच, आपणच जणू स्वप्नात (किंवा कल्पनेत) तो अनेक वेळा बघतो. कारण लोकांसमोर मांडण्याआधी तो आपल्या डोळ्यासमोर येणं खूप गरजेचं असतं. कधीकधी मूळ कथा आपली स्वतःची नसते. अशावेळीही ती कथा किंवा तो विषय मनातल्या-मनात आपल्या डोळ्यासमोर उभा करावा लागतो. ही पायरी बहुतांशी कल्पनाविश्वातली असते, स्वप्नातली (Dreaming) असते. पण तरीही हीच पायरी पुढच्या पूर्ण यशाचं मूळ ठरते.

Draft: एकदा आपल्या मनात आपल्या फिल्मची संकल्पना व्यवस्थित उभी राहिली की ती कल्पना व्यवस्थित तपशीलवार लिहून काढली जाते. आपल्या अॅनिमेशनपटाचे अपेक्षित दर्शक कोण असतील, तो कोणाला उद्देशून असेल, त्याचं माध्यम टेलीव्हिजन, थिएटर ई. पैकी कोणतं असेल, हा अॅनिमेशनपट किती वेळेचा असेल, अशा अनेक मुद्द्यांवर विचारमंथन केलं जातं. अशाप्रकारे ध्येय, उद्देश व माध्यम (Goal, Purpose and medium) ई. बाबींची निश्चिती केली जाते. बऱ्याचवेळा अशा प्रोजेक्ट्समध्ये लेखक, दिग्दर्शक, अॅनिमेटर अशा अनेक व्यक्ती संलग्न असतात. त्यामुळे आपापसांत संभाषण अधिकाधिक स्पष्ट व सहज व्हावं म्हणून या वैचारिक गोष्टींना थोडंसं मूर्त रूप आणलं जातं. ज्यामध्ये कथा, पटकथा, कथेतील पात्रांचे संवाद ई. गोष्टींचा अंतर्भाव असतो. सगळ्या मंडळींच्या डोळ्यासमोर एकच संकल्पना यावी आणि सर्वांच्या विचारांची दिशा एकच व्हावी हाच यामागचा उद्देश असतो. आता वेळ येते ती आपल्या प्रोजेक्टची कथा चित्ररूपात तयार करण्याची, म्हणजेच story-board तयार करण्याची. संपूर्ण कथानक दृश्यरुपात पाहता यावं किंवा visualize व्हावं, त्याचा आढावा घेता यावा यासाठी storyboard चा छान उपयोग होतो. हे करताकरता पात्रांचा संभाषणाला लागणारा वेळ, कॅमेरा अॅंगल्स, कॅमेऱ्यात दिसणाऱ्या सर्व प्रमुख गोष्टींची माहिती लिहिली जाते. पार्श्वभूमीचा व इतर अनेक घटकांचाही आढावा घेतला जातो. अशा प्रकारे script आणि screenplay तयार होतो. स्क्रीनवर कायकाय प्ले झालं पाहिजे हे मांडणं म्हणजेच screenplay. याचप्रमाणे कथेतील दृश्यांची रंगसंगती, पार्श्वभूमीची मांडणी, पात्रांची दृश्य वर्णने, पेहराव, अशा अनेक घटकांची माहिती मांडली जाते.

Design: प्रत्यक्ष काम करताना उपयोगी पडणाऱ्या अनेक तांत्रिक बाबींची निश्चीती या टप्प्यात केली जाते. अगदी संपूर्ण प्रोजेक्टसाठी किती वेळ जाऊ शकतो इथपासून ते कोणत्या दिवशी काय काम असेल अशा कित्येक तपशिलांची आखणी या टप्प्यात होते. या टप्प्यातंच Production design निश्चित केलं जातं. कोणत्या कामासाठी कोणतं software वापरावं लागेल, तसंच कोणत्या कामासाठी इतर कोणती तयारी असावी लागेल, अशा अनेक गोष्टी ठरवल्या जातात.

अशाप्रकारे प्री-प्रॉडक्शनच्या या तीन टप्प्यात संपूर्ण कामाचा आढावा घेऊन आराखडा निश्चित होतो.

“अॅनिमेशन करणं म्हणजे गाडी चालवण्यासारखं समजलं तर प्री-प्रॉडक्शन म्हणजे जणू अॅनिमेटरसाठी तयार केलेले नकाशेच. ज्यांचा आधार घेऊन पुढे गेल्यावर बरोबर जागी आपली गाडी पोचेल.”

Q: वा! हे उदाहरण मस्तं आहे. आता मला बरंच लक्षात आलं.

अर्थात आपण आपली animated short film करताना हे सगळं अनुभवणार आहोतच. त्यावेळी आणखी मजा येईल. पुढच्या भागात आपण pre-production नंतरच्या म्हणजे production च्या बाबतीतली माहिती घेऊया. तर मग पुन्हा भेटू, पुढच्या भागात.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

8 comments

 1. Wonderful articles sir! I am reading all the articles. Each one is very interesting. Thnk U.

 2. ha lekh khun changala lihila ahe. mala khup avadla. mi sarv bhag vachto ahe. mala animation shikayla avdel.

 3. धन्यवाद! पुढचे भाग आणखी मजेदार आहेत आणि विशेषतः व्हॉल्यूम तीन हा प्रत्यक्ष प्रोडक्शनचा असल्यामुळे जास्त माहितीप्रधान आहे. वाचताना काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा.

 4. Nice lesson
  I really happy for the read

 5. Thanks Ajay. Hope you liked other articles also.

 6. Sir , application kiwa boik application
  Asle tr please email kara

Pingbacks

 1. अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Modeling | Advaita Studios
 2. A05- कॉम्प्युटर ग्राफिक्स (CG)- व्याप्ती व आवाका | Advaita Studios