Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
31
Dec

A10- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Post-Production

C. Post Production (पोस्ट-प्रोडक्शन): पोस्ट प्रोडक्शन हा प्रोजेक्ट एक्झिक्युशन पाईपलाईन मधला सर्वात शेवटचा टप्पा. आपण आधी बघितल्याप्रमाणे रेंडर इंजिन हे 3D मॉडेल पासून 2D इमेज तयार करते. आपल्या फिल्ममधील कथेप्रमाणे अनेक शॉट रेंडर केले जातात. असे रेंडर झालेले सर्व शॉट एकत्र करून त्यावर काही प्रक्रिया केल्या जातात. चित्रकार ज्याप्रमाणे चित्र पूर्ण रंगवून झाल्यावर त्यावर शेवटचा हात फिरवतो, त्याप्रमाणे आपल्या रेंडर झालेल्या शॉट्सवर शेवटचा हात फिरवण्याचं काम या टप्प्यात केलं जातं. या कामाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. ते असे:

Q: हं … ३! मला माहीतच होतं 🙂

हा…हा, बघूया तर मग एक एक करून.

Project-Pipeline-PipeA-926D

1. Touch-up: यालाच Compositing (कंपोझिटिंग्) असंही म्हटलं जातं. या भागात प्रत्येक शॉटचा स्वतंत्रपणे विचार करून प्रत्येकावर प्रक्रिया केली जाते. समजा रेंडर झाल्यावर शॉटमधे काही बारीकसारीक सुधारणा आवश्यक असतील, तर त्या या भागात केल्या जातात. शॉटच्या गरजेप्रमाणे त्याच्या रंगसंगतीत सुधारणा किंवा बदल केले जातात. म्हणजेच Colour Correction केलं जातं. तुम्ही स्पेशल इफेक्ट्स सारखे शब्द नक्कीच ऐकले असतील. असे इफेक्ट्स सुद्धा या भागात दिले जातात. उदा. Glow, Blur, Motion Blur, Depth of field, Masking इत्यादी. अशा अनेक इफेक्ट्सचा वापर करून आपले शॉट अधिकाधिक आकर्षक केले जातात. अनेक प्रकारचे फिनिशिंग टचेस दिले जातात.

2. Mix: आधी बघितल्याप्रमाणे एकदा शॉटवर कंपोझिटिंग् झालं की असे शॉट एकापुढे एक मांडले जातात. त्यांचा क्रम ठरवला जातो, म्हणजेच शॉटचं सिक्युएन्सिंग केलं जातं. गरज वाटल्यास त्यांचं टाईमिंग बदललं जातं. दोन शॉटच्या मधे गरज असल्यास काही मिक्सिंग इफेक्ट्स दिले जातात. अशाप्रकारची कामं Editing (एडिटिंग्) या टप्प्यात मोडतात. याशिवाय एडिटिंग् करताना शॉटच्या बरोबर संवाद आणि पार्श्वसंगीत यांचे ऑडीओसुद्धा क्रमाने जोडले जातात. अशा प्रकारे व्हिडिओ आणि ऑडीओ एकमेकांना Sync केले जातात.

3. Pack: वरच्या सर्व प्रक्रिया झाल्यावर त्यापासून शेवटचा एकसंध (synced) video तयार होतो. असा व्हिडिओ बनताना कमीतकमी साईझ मधे चांगल्यात चांगल्या प्रतीचा कसा बसवता येईल ते बघितलं जातं. यालाच कॉम्प्रेशन आणि एनकोडींग (Compression and encoding) म्हणतात. असा तयार झालेला व्हिडिओ mpeg-4 सारख्या format मधे असतो. तो आपण सर्व साधारण कोणत्याही मिडिया प्लेयर वर पाहू शकतो. आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो. इथेच आपलं फिल्म तयार करण्याचं काम पूर्ण होतं.

Q: अरे वा! म्हणजे आपण ज्या फिल्म्स DVD किंवा कंप्युटरवर बघतो, त्या याच प्रोसेस-मधनं आलेल्या असतात?

फक्त याच नाही तर तीनही मुख्य फेजेस मधून फिल्म जाते. त्यांच्या बद्दल आपण सविस्तर बोललोच आहोत. प्रोजेक्ट एक्झिक्युशन पाईपलाईनच्या तीनही मुख्य भागांची आपण माहिती घेतली. प्री-प्रोडक्शन मधे आपण कथा, पटकथा, स्टोरीबोर्ड इत्यादींची माहिती घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रोडक्शन कशाप्रकारे केलं जातं हे बघताना मॉडेलिंग, अॅनिमेशन आणि रेंडरींग इत्यादी टप्पे बघितले. आणि सर्वात शेवटच्या पोस्टप्रोडक्शनच्या टप्प्यात कंपोझिटिंग् आणि एडिटिंग इत्यादीबद्दल माहिती घेतली. या सगळ्यातून पुढे जात जात आपली फिल्म घडत जाते.

अशा प्रकारे आपल्या या सिरीजचा पहिला खंड म्हणजे Volume 1 आज इथेच संपतोय. माझी खात्री आहे की, आत्तापर्यंतचे लेख वाचताना तुम्हाला नक्की मजा आली असेल. आपण कधी एकदा आपली अॅनिमेशन फिल्म तयार करायला घेतोय असं तुम्हाला वाटत असणार. इथून पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष अॅनिमेशन फिल्म बनवण्याच्या दृष्टीनी गप्पा मारणार आहोत. या संपूर्ण सिरीजचा आराखडा पुन्हा बघण्यासाठी, Vol1 part 2 नक्की वाचा. पुढच्या लेखापासून दुसऱ्या खंडाला (म्हणजे Volume 2 ला) प्रारंभ होत आहे. तो भाग पहिल्या भागापेक्षाही जास्त मजेदार करण्याचा माझा प्रयत्न आहे. इथपर्यंतचे लेख वाचताना कसे वाटले ते मला आवर्जून कळवा. आपल्याला काही सुधारणा किंवा सूचना सांगायच्या असतील तर त्याही मला नक्की कळवा. आपण आमच्या फेसबूक पेज लाही नक्की शेअर करा. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या खंडात, नवीन लेखासह धम्माल गप्पा मारायला. काय मग? आहात ना तयार?…

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.