Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
28
Jan

B04- कथा मांडणी

या व्हॉल्यूमच्या पहिल्या भागात आपण आपल्या शॉर्ट-फिल्मची साधारण कथा बघितली होती. काही आठवतंय स्टोरी बद्दल?

Q: हो. टिंगू नावाच्या एका टेबललॅंप वर आधारलेली ती आहे.

बरोबर. आता आपल्या फिल्मच्या प्री-प्रोडक्शन-साठी आपल्याला तिची स्क्रिप्ट तयार करायची आहे. त्यासाठी या भागात आपण आपल्या कथेची मांडणी कशी करता येईल ते बघूया.

स्क्रिप्ट लिहिताना बहुतेकवेळा साधा वर्तमानकाळ किंवा Simple present tense वापरला जातो. ती गोष्ट जणू काही आत्ताच घडतीये असं सांगितलं जातं. फिल्मची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी तिचे  भाग पडले जातात.

Q: तीन भाग असतील तर मला नवल वाटणार नाही.

हो, साधारणपणे तीनच मुख्य भाग केले जातात. अशा प्रत्येक भागाला एक एक ACT म्हणतात.

ACT 1 हा story establishment चा असतो. म्हणजे प्रेक्षकांना आपल्या गोष्टीतल्या कॅरेक्टर्सची आणि एकंदर कथेची ओळख करून देण्यासाठी तो वापरतात. आपल्या स्टोरीतही आपल्याला टिंगू आणि त्याच्या आजूबाजूच्या वस्तू प्रेक्षकांसमोर हळूहळू मांडता येतील. सुरवातीला कदाचित आपण एखादं गजराचं घड्याळ वाजतंय असं दाखवू शकतो. तो आपल्या गोष्टीचा Trigger event होईल. टिंगू झोपेतून जागा होतो आणि आळस देतो. थोडं इकडे तिकडे बघतो. तेंव्हा त्याला बाजूला रुबिक्स क्यूब दिसतो. अशा प्रकारे आपण आपल्या गोष्टीचा सीन प्रेक्षकांसमोर उभा करू शकतो.

दुसरा भाग म्हणजे ACT 2 मधे आपण आपली मुख्य स्टोरी मांडू. क्यूब बघून टिंगूला त्याचे रंग बरोबर लावायचं मनात येतं. सगळे रंग लागल्याचं चित्र तो डोळ्यासमोर आणतो. त्यामुळे तो उत्साही होतो आणि तसं करायला जातो. पण आपल्या टिंगूला हात कुठयंत. त्यामुळे तो डोकं आणि त्याचा बेस यामध्ये क्यूब धरून तो फिरवण्याचा प्रयत्न करून बघतो. पण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही रंग बरोबर लावायचं, त्याला काही जमत नाही. त्याचे ते अटीतटीचे प्रयत्न एका मागोमाग एक दाखवून आपण आपली स्टोरी अगदी शिगेला पोचवू शकतो. आणि हाच ACT 2 चा उद्देश आहे.

ACT 3 हा Resolution चा असतो. म्हणजे गोष्टीतला गुंतत गेलेला तिढा सुटण्याचा. सगळे प्रयत्न फसल्यामुळे टिंगू वैतागतो. कंटाळून तो क्यूब डोक्यानी उडवून देतो. आणि उदासपणे खाली मान घालून बसतो. उडालेला ठोकळा मागच्या भिंतीवर आपटून परत त्याच्या शेजारी येऊन पडतो. तेंव्हा त्याचे रंग लागलेले असतात. खात्री करण्यासाठी टिंगू दोन तीनदा तसं करून बघतो. क्यूबचे रंग बरोबर लागलेले बघून त्याला आनंद होतो. आणि तो उड्या मारायला लागतो. इथे आपली मुख्य स्टोरी संपते.

तर अशी ही आपली फिल्मची कच्ची स्क्रिप्ट तयार झाली. अर्थात यात अजून अनेक टेक्निकल गोष्टी लिहिता येतील. म्हणजे शॉट नंबर, कॅमेरा अॅंगल्स इत्यादी. पण सध्या आपण इतक्या खोलवर नको जायला. स्क्रिप्ट प्रत्यक्ष लिहिण्यासाठी किंवा टाईप करण्यासाठी तुम्ही Microsoft word, Apple Pages किंवा Open-office writer सारखं कोणतंही word processing सॉफ्टवेअर वापरू शकता. हीच स्क्रिप्ट चित्रांच्या भाषेत तयार केली की तिला स्टोरीबोर्ड म्हणतात. पुढच्या एका भागात मी तुम्हाला स्टोरीबोर्डसाठी स्केचेस कशी काढली जातात ते दाखवीन. तुम्हालाही ते बघायला नक्की आवडेल.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.