Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
18
Feb

B07- ब्लेंडर मधील Modeling

आपण ब्लेंडर इन्स्टॉल कसं करायचं आणि चालू केल्यावर त्याचे काही सेक्शन कसे असतात ते बघितलं. तुमच्या कंप्युटरवर आता ब्लेंडर व्यवस्थित चालतंय, बरोबर? आणि तुम्ही ते थोडंफार वापरूनही बघितलं असेल. आता आपण ब्लेंडर मध्ये Modeling, Animation आणि rendering या गोष्टी कशा काम करतात ते थोडक्यात समजून घेऊ. नंतर व्हॉल्यूम 3 मधे तर आपण या सगळ्या गोष्टी आणखी खोलात बघणारच आहोत.  या भागात आपण Modeling बघूया.

मागच्या भागात आपण बघितलं होतं की 3D viewport मधे क्लिक केलं की तिथे एक रिंग उमटलेली दिसते आणि ब्लेंडर मध्ये तिला 3D cursor म्हणतात. नवीन 3D object आणण्यासाठी याच cursor चा उपयोग होतो. Viewport च्या खालच्या पट्टीत Add मेनू मध्ये Mesh मधे आपण Cube आणि तसेच आणखी काही 3D आकार बघितले होते. त्यांच्यावर क्लिक केली की ते ते Object तयार होतात, हे आपण बघितलं होतं Recommended Reading.
हा क्रम, सांगताना सोप्पा जावा म्हणून, इथून पुढे मी तो असा लिहित जाईन.
3D view > Add > Mesh > Cylinder

म्हणजे, एक-एक करत, मेनूमध्ये कसं क्लिक करत जायचं ते तुम्हाला लगेच समजेल.
आता आपण मॉडेल म्हणून एक सोप्पं टेबल तयार करू. तेही फक्त Cubes पासून.

Q: काय? फक्त cubes पासून?

हो. Viewport च्या मध्यभागी जो cube दिसतोय, त्याला जर आपण वरून दाबून चपटं केलं, तर त्याचा आपण टेबलाचा टॉप बनवू शकतो. आणि अशाच आणखी 4 उंच cubes पासून टेबलाचे पाय बनवू शकतो. नाही का? मग करणार माझ्या बरोबर?

Q: एकदम, मी तयार आहे.

पहिल्यांदा आपण ब्लेंडरची नवीन फाईल चालू करू. एकदम वरती डाव्या कोपऱ्यात फाईल मेनू आहे.

File> New> तिथे क्लिक करा. ब्लेंडर एक Option विचारेल:  ‘Reload Start-up File’.

त्याच्यावर क्लिक करा किंवा Enter दाबा. म्हणजे आता ब्लेंडर ची फ्रेश फाईल चालू होईल.

आता viewport मधल्या cube वर राईट क्लिक करा. आपल्याला त्याचा आकार बदलायचाय. Viewport मधेच माउस ठेऊन की-बोर्डचं ‘N’ बटन दाबा. म्हणजे Viewport च्या उजव्या भागात एक Panel उघडेल. या Panel वर माउस नेउन स्क्रोल करून बघा. इथे तुम्हाला बरीच बटन्स आणि टूल्स दिसतील. पण सध्या आपल्याला या Panel बद्दल फार खोलात जायचं नाहीये. आता त्याच्या एकदम वरच्या बाजूला बघा. तिथे तुम्हाला एक ‘Transform’ नावाचा सेक्शन दिसेल. आणि त्याच्यातच तुम्हाला ‘ Location, Rotation, Scale आणि Dimensions’ असे चार भाग दिसतील.

B07A-Blender-Transform-panel

दिसले? आपल्याला टेबल बनवण्यासाठी हेच भाग लागणार आहेत. यातल्या ‘Dimensions’ मध्ये आपल्याला X, Y, Z मध्ये प्रत्येकात 2 लिहिलेले दिसतायत. हे आकडे आपल्या सिलेक्टेड cube च्या Dimension चे आहेत. म्हणजेच आपला Cube हा लांबी, रुंदी आणि उंची मध्ये 2 units चा आहे. (आपण असं समजू की तो 2 meter चा आहे. पुढे आपण खरी-खूरी एककं वापरूच.)

टेबलचा टॉप हा साधारण 2 m x 1 m साईजचा चालेल आणि त्याची जाडी 8 ते 10 cm असू शकेल. म्हणजेच या Cube ला आपल्याला 2m x 1m x 10cm साईजचं बनवावं लागेल. हे करण्यासाठी त्याच्या Dimension मधल्या X, Y आणि Z साईझचा वापर करता येईल. या उदाहरणात X म्हणजे त्याची लांबी (2m), Y म्हणजे रुंदी (1m) आणि Z म्हणजे त्याची जाडी (10cm किंवा 0.1m) असं असेल. Cube चे हे Dimensions बदलण्यासाठी आपल्या मगाचच्या Panel मधल्या Dimension भागात X, Y, Z मध्ये क्लिक करून तिथे आकडा टाइप करा आणि Enter दाबा. Cube चं X Dimension सध्या 2 आहे आणि आपल्याला तेवढंच हवंय म्हणून आपण त्याला सोडून देऊ. आता Y वर क्लिक करून तिथे 1 टाइप करा आणि Enter दाबा. म्हणजे तुम्हाला Cube चा साईज बदललेला दिसेल. असंच आता आपण Z dimension बदलू. Z मध्ये क्लिक करून तिथे 0.1 टाइप करा. Enter केल्यावर तुम्हाला Cube ची उंची कमी झालेली दिसेल. मागच्या भागात बघितल्याप्रमाणे या आपल्या नवीन टेबल टॉपला जवळून आणि वेगवेगळ्या बाजूने बेघा.

B07B-Cube1-scale

आता आपण असेच आणखी Cube काढू आणि त्यांच्यापासून टेबलाचे पाय बनवू.

3D view > Add > Mesh > Cube क्लिक केल्यावर दुसरा Cube तयार झालेला दिसेल. हा पाय असल्यामुळे आपण तो उंच बनवू. या Cube च्या Dimensions भागात हे आकडे Enter करा. X : 0.1, Y: 0.1, Z: 0.8

मागच्या भागात आपण Cube ला हलवण्यासाठी Viewport मध्ये दिसणाऱ्या बाणांचा उपयोग केला होता. या बाणांना 3D सॉफ्टवेअर मधे Axis Handles म्हणतात. आता या Handles ला धरून तुम्ही या दुसऱ्या Cube ला टेबलाच्या खाली आणि एका कडेला हलवून ठेवा. एक एक करत X, Y आणि मग Z दिशेला Cube हलवा.  म्हणजे आता आपल्या टेबलाचा टॉप आणि एक पाय तयार झाला. आता असंच तुम्ही आणखीन तीन वेळा पाय करून ठेवा म्हणजे पूर्ण टेबल तयार होईल.

B07C-Legs-scale

या झालेल्या टेबलाला तुम्ही वेगवेगळ्या बाजूने, जवळून लांबून बघा. अशा तऱ्हेने तुमचं पाहिलं Model तयार झालं. आता ही फाईल सेव्ह करायची असेल तर अशी करा: File Menu > Save > आणि इथे तुमच्या फाईलचं एखादं नाव आणि Path देऊन इतर सॉफ्टवेअर प्रमाणे Save करू शकाल.

आता तुम्ही अशीच काही चित्रं किंवा आकृत्या करून बघा. काही अडलं तर मला नक्की विचारा. व्हॉल्यूम 3 मध्ये आपण आणखी खोलात बघूच. पुढच्या भागात मी तुम्हाला ब्लेंडर मधल्या Animation विषयी सांगेन. तर मग पुन्हा भेटूच.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.