Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
25
Feb

B08- ब्लेंडर मधील Animation

ब्लेंडरमधे 2D Classical animation जरी तयार करता येत असलं, किंवा फ्रेम-बाय-फ्रेम पद्धत जरी वापरता येत असली तरी, ब्लेंडर हे खरंतर 3D आणि Key-frame animation करण्यासाठी तयार झालंय. Animation बद्दल बोलताना आपण मागच्या एका भागात Key-frame animation बद्दल गप्पा मारल्या होत्या. आपण बघितलं होतं की Key-frame पद्धतीमधे आपल्याला सुरवातीच्या, शेवटच्या आणि मधल्या मुख्य पोझेसची माहिती सॉफ्टवेअरला द्यावी लागते. या माहितीवरून आणि मधल्या वेळेच्या फरकावरून सॉफ्टवेअर उरलेलं Animation तयार करतं.

ब्लेंडरमध्ये Animation करण्यासाठी आपल्याला viewport च्या खाली असलेला Timeline सेक्शन वापरावा लागेल. आपण आता त्याचीच माहिती घेऊया.

B08A-Timeline2

इथे तुम्हाला एक लांब आडवी टाइमलाइन दिसेल, तिच्यात एक उभी हिरवी रेष दिसतीये आणि त्याच्या खाली Frames चे आकडे दिसतील.

B08A-TimelineCropped

ही उभी रेष म्हणजे आपली चालू frame. त्याच्या खाली काही मेनू आहेत – ‘View, Marker, Frame आणि Playback’ इत्यादी.  नंतर Start frame, End frame आणि चालू Frame चे आकडे आहेत. आणि पुढे मिडिया-प्लेयर मधे असतात तशी Play, Pause अशी काही बटन्स आहेत. याच्या पुढच्या बटन्सचा विचार आपण आत्ता नाही केला तरी चालेल. हा सगळा सेक्शन Timeline म्हणून ओळखला जातो. आणि Animation साठी लागणाऱ्या सर्वात महत्वाच्या माहितीचं म्हणजेच वेळेचं गणित करायला याचा उपयोग होतो. ‘Timing’ शिवाय Animation होऊच शकत नाही.  त्यामुळे Animation कडे कल असणाऱ्यांसाठी हा एकदम महत्वाचा सेक्शन ठरतो.

सगळ्या सॉफ्टवेअर्स मधे Time हा Frames मध्ये मोजला जातो. ब्लेंडरमध्ये सध्या 1 sec म्हणजे 24 frames असं सेटिंग आहे. म्हणजे Timeline मधल्या 24 Frames चं Animation केलं तर ते 1 sec चालेल. 1 मिनिटाचं Animation करण्यासाठी 1,440 frames लागतील. 1 min = 60 sec आणि  60 x 24 frames = 1,440 frames. आपण असं काहीतरी गणित खूप सुरवातीला एकदा केलं होतं. व्हॉल्यूम 1 मधला ‘तो भाग’ आठवला ना?

Q: हो, पहिल्यांदा मला खूप भीती वाटली होती, पण मग तुम्ही Computer Animation बद्दल सांगितलं. आता मला खूप interest वाटतोय.

आता ब्लेंडरमध्ये Animation नक्की कसं करायचं ते आता आपण बघू. यासाठी एखादं सोप्पं उदाहरण घेऊन घेऊ. ब्लेंडर चालू केल्यावर मध्यभागी जो Cube दिसतो त्यालाच आपण Animate केलं तर? आपण असं समजू की तो ठोकळा आपल्याला उजवीकडे जाताना दाखवायचं. आणि तो सरकायला साधारण 2 सेकंदं लागतील असं आपण समजू.

Key-frames चा विचार केला तर अगदी सुरवातीच्या frame ला Cube आहे तिथेच राहील. नंतर दोन सेकंदांनी म्हणजेच 48 frames नी तो उजवीकडे काही अंतरावर असेल. बरोबर? म्हणजे आपलं पाहिलं Animation 2 sec किंवा 48 frames चं होईल.

आपल्या या उदाहरणात पहिली आणि शेवटची फ्रेम याच key-frames आहेत. या दोन framesच्या वेळेत 48 frames इतकं अंतर आहे. आपल्याला ब्लेंडरला या key-frames सांगायला लागतील आणि Cube किती सरकेल ते सांगावं लागेल. या दोन गोष्टींवरून ब्लेंडर या ठोकळ्याचं Animation करू शकेल. थोडक्यात आपल्याला ब्लेंडरला ‘कुठे’ आणि ‘कधी’ ते सांगायचंय. ‘का’ हा मात्र आपला प्रश्न राहील. मागच्या भागात आपण ‘N’ बटन दाबून येणाऱ्या ‘Properties Panel’ मध्ये ‘Location, Rotation, Scale’ बघितलं होतं ते आठवतय ना? आपल्याला Cube हललेला दाखवायचं म्हणजेच त्याचं ‘Location’ चं Animation करायचंय.

तुमच्या कंप्युटरवर आता ब्लेंडर चालू करा. Viewport मधे जो मध्यभागी Cube दिसतोय त्याला आपण Animate करूया. पहिल्यांदा Timeline मध्ये हिरवी रेष पहिल्या frame वर आहे की नाही याची खात्री करा. आपल्या Animation मध्ये पहिल्या frame ला Cube चं ‘Location’ आहे तिथेच असणार आहे. आपली पहिली key-frame ही त्याच म्हणजे Frame 1 लाच आहे, हे आता आपण ब्लेंडरला सांगूया. यासाठी माउस viewport मधे ठेवून Keyboard वरचं ‘I’ बटन दाबा. म्हणजे एक ‘Insert Key-frame Menu’ येईल. या मेनूतल्या म्हणजे ‘location’ Option वर क्लिक करा. आता Timeline मध्ये तुम्हाला हिरव्या रेषेच्या जागी पिवळी रेषा आलेली दिसेल. आता जर तुम्ही माउसनी या रेषेच्या उजव्या बाजूला क्लिक केलं तर तिथे हिरवी रेष जाईल. आणि पहिल्या frame वर पिवळी रेष तशीच दिसेल. Timeline मधली हिरवी रेष म्हणजे चालू frame आणि पिवळी रेष म्हणजे Key-frame. ब्लेंडर ला आता माहितीये की Cube साठी पहिली frame ही Key-frame आहे. आणि त्या frame ला Cubeचं Location (0,0,0) आहे.

B08B-InsertKeyframe-1

आता आपण ब्लेंडरला दुसरी Key-frame सांगूया. आता Timeline मध्ये माउसनी क्लिक करून चालू frame हलवून बघा. खाली ‘Start आणि End’ च्या पुढे जो आकडा दिसतोय तो बदलताना दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही 48 टाइप करू शकता. म्हणजे आता ब्लेंडरची चालू (Current) key-frame झाली 48. आता Cube च्या ‘Y’ axis च्या handle ला धरून त्याला थोडं उजव्या बाजूला ओढा. हे आपल्या Cube चं नवं ‘Location’. आता पुन्हा ‘I-KEY’ दाबून ‘Location option’ सिलेक्ट करा.

B08B-InsertKeyframe-48

म्हणजे आता Cube ची ही दुसरी Key-frame झाली. आता ब्लेंडरनी Cube च्या मधल्या frames ची सगळी गणितं केलेली असतील आणि त्याचं Animation सुद्धा तयार असेल.

आता Timeline मध्ये End frame मध्येही 48 सेट करा. आणि पुढचं ‘Play’ चं बटन दाबा.

B08C-Animation

काय जातोय ना Cube पुढे? आहे ना Interesting?

Q: अरे वा, हे एकदम भन्नाट आहे.

हो, तुम्ही आत्ता तुमचं पहिलं ३D animation केलं. ब्लेंडरनी सगळी गणितं करून तुमच्यासाठी तयार ‘इन-बिटवीन’ फ्रेम्स काढल्या. मजा आहे ना? आता तुम्ही नवीन फाईलमधे अशीच वेगवेगळी Animations करून बघा. काही लक्षात आलं नाही तर मला नक्की विचारा. पुढे आपण Animation आणखी खोलात बघूच. तोपर्यंत नमस्कार!

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.