Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
04
Mar

B09- ब्लेंडर मधील Rendering

आपण आतापर्यंत ब्लेंडरमधे Modeling आणि Animation कसं करतात ते बघितलं. या भागात आपण Rendering कसं करायचं ते बघूया. Rendering केल्यामुळे आपल्याला आपल्या मॉडेलची image किंवा Video मिळतो, जो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो. आपण आधी बघितल्याप्रमाणे असा photo किंवा video हा pixel च्या भाषेत तयार होतो. म्हणजेच तो jpeg किंवा avi, mpeg अशा format मधे असतो. तो बघताना ब्लेंडर सारख्या सॉफ्टवेअर्सची जरुरी नसते.

आता rendering करायचं म्हणजे अर्थातच आपल्याकडे काही मॉडेल्स आणि त्यांचं काही फ्रेम्सचं Animation लागेल. तुमचा वेळ वाचवा म्हणून, मी तुम्हाला ब्लेंडरची एक तयार फाईल देणार आहे. ती फाईल डाउनलोड करून आपण थेट rendering बद्दल गप्पा मारुया. तयार फाईल डाउनलोड करण्यासाठी ‘इथे क्लिक करा’ आणि ती तुमच्या कम्प्युटरवर सेव्ह करून घ्या.

एकदा ती फाईल तुम्हाला मिळाली की ती डबल-क्लिक करून चालू करा. ब्लेंडर मध्ये फाईल सुरु झाली? ती साधारण अशी दिसेल:

B09-A1-filedefaultopened

या फाईलमध्ये Cube, Cylinder, Sphere असे काही Animation असलेले आकार आहेत. या फाईलमधला Viewport सध्या Camera view ला सेट केलेला आहे. म्हणजे ब्लेंडर मधल्या Camera object मधून बघितल्यावर जसं दिसेल तसं या Viewport मधे दिसतंय. Timeline मधलं ‘Play’ बटन दाबलत तर तुम्हाला त्यातलं Animation दिसेल.

B09-A2-timeline-play

आता आपण त्याचं rendering कसं करता येईल ते बघू. ब्लेंडरमधे Viewport च्या उजव्या बाजूला जो मोठा ‘Properties’ सेक्शन आहे त्यात लगेचच तुम्हाला ‘Render Panel’ चालू असलेला दिसेल. या Panel मधे वरतीच तुम्हाला तीन मोठी बटन्स दिसतील. ‘Render, Animation आणि Audio’. पहिल्यांदा आपण ‘Render’ बटन बघू. हे बटन दाबल्यावर viewport मध्ये तुम्हाला चित्रं तयार होताना दिसेल.

B09-B-Render-single-image

खरंतर Viewport च्या ऐवजी आता ‘Image viewer’ चालू झालेला आहे. 3D objects पासून असं चित्रं तयार होण्यालाच ‘Rendering’ म्हणतात, हे आपण मागे बघितलंच होतं. बटन दाबल्यावर चालू फ्रेमचं चित्रं ब्लेंडरनी तयार केलं. हे चित्रं तयार करताना ब्लेंडर अनेक गोष्टींचा विचार करतो. त्यात कॅमेरा आणि त्याचा वस्तूंकडे बघण्याचा कोन (Camera angle) आणि लाइटिंग इत्यादी महत्वाच्या बाबी असतात. Render झालेल्या चित्रात, लाईटमुळे वस्तूंच्या पृष्ठभागात आणि रंगात होणारं शेडिंग दिसतंय. शिवाय लाईटमूळे पडणाऱ्या सावल्याही अगदी स्पष्ट दिसतायत.

ही Render झालेली image तुम्हाला सेव्ह करायची असेल तर: Image viewer> Image> Save As Image वर क्लिक करा, तुम्हाला ज्या ठिकाणी सेव्ह करायची असेल तो path द्या आणि save बटन दाबा, की झाली तुमची image तयार.

B09-C-save-image

आता थोडं या Render Panel बद्दलच बोलूया. इथे तुम्हाला Render करण्याच्या बाबतीतली काही मुख्य settings दिसतील.

B09-D1-render-upper

अगदी सुरवातीला Dimensions भागात तुम्हाला Resolution दिसेल. त्यात सध्या 1920 x 1080 pixels म्हणजेच HD Resolution सेट केलेलं दिसेल. शेजारी Frame range मध्ये कोणत्या Frame पासून ते कुठपर्यंतचं Animation रेंडर करायचंय ते दिसेत. सध्या ते Frame 1 ते 160 सेट केलेलं आहे. म्हणजे आपण पूर्ण Animation Video जर render केला तर तो 160 फ्रेम्सचा किंवा साधारण 7 सेकंदाचा होईल.

हा Panel scroll करून जर खाली बघितलात तर तुम्हाला सेव्ह करण्याचे काही Options दिसतील. Animation सेव्ह करण्यासाठी आपण आता त्याची setting बघूया. इथे ‘Output’ सेक्शन मधे तुम्हाला एक नाव मी आधीच टाइप केलेलं दिसेल- “//B09-MyFirstRendering-“. याचा अर्थ Animation चं rendering झाल्यावर ती Video फाईल ब्लेंडर या नावानी सेव्ह करेल. त्याच्या पुढचं फोल्डरचं बटन दाबून तुम्हाला चालेल असा Path सेट करा. म्हणजे render करताना फाईल तिथे सेव्ह केली जाईल. त्याच्या खाली मी MPEG हा format सेट केलेला दिसेल. म्हणजे हा तयार होणारा व्हिडिओ MPEG format मध्ये असेल. आणि तो तुम्ही नेहमीच्या मिडिया प्लेयर मधून बघू शकाल.

B09-D2-render-lower

सध्या एवढी सेटिंग्स पुरेशी आहेत. आता पूर्ण Animation चं rendering करण्यासाठी या panel मधलं एकदम वरचं दुसरं मोठं बटन दाबा: ‘Animation’. हे बटन दाबल्यावर ब्लेंडर एक एक करत प्रत्येक फ्रेम ची चित्रं तयार करायला सुरवात करेल. असं 160 फ्रेम्स होई पर्यंत चालू राहील. तोपर्यंत शक्यतो ब्लेंडरमध्ये काही करू नका. या सगळ्या फ्रेम्सचं rendering व्हायला तुमच्या कंप्युटरच्या स्पीड नुसार कमी-जास्त वेळ लागेल. अगदी स्लो कंप्युटरवर साधारण अर्धा तासही लागू शकेल. पण काही काळजी करू नका. ब्लेंडर सगळं आपोआप करेल. सगळ्या 160 फ्रेम्स झाल्या की तुम्ही दिलेल्या Output path मध्ये हा Video तयार असेल.

Q: हो, माझ्या मशीनवर आता ‘रेंडरींग’ सुरु झालंय. मला प्रत्येक फ्रेम मध्ये बदल होतानाही दिसतोय.

एकदा सगळं रेंडरींग संपलं की ती फाईल My Computer मधून उघडा, प्ले करून बघा आणि इतरांनाही दाखवा. झाला की तुमचा पहिला animation video तयार.

तुम्हाला काही कारणांनी असा व्हिडिओ render करायला जमला नाही तर, तुम्हाला बघण्यासाठी तो इथे देत आहे. ‘या लिंकवर’ क्लिक करून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. शिवाय तुम्हाला render करताना काही अडत असेल तर ते मला नक्की सांगा. मी माझ्याकडून आणखी विस्तारानी सांगण्याचा प्रयत्न करीन.

आत्तापर्यंतच्या ब्लेंडरच्या भागांवरून तुम्हाला ब्लेंडर वापरण्याची साधारण कल्पना आली असेल, असं मला वाटतं. आता पुढच्या काही भागांत आपण पुन्हा आपल्या Animation short-film कडे वळणार आहोत. त्यात आपण कथाविस्तार (Story-development), पटकथा (Script) आणि storyboard इत्यादींबद्दल गप्पा मारणार आहोत. आपल्या टिंगूच्या फिल्मसाठी लागणारी काही स्केचेस आपण काढणार आहोत. त्यामुळे पुढचे भाग आणखी मजेदार होतील. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.