Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
03
Jun

C01- फिल्म प्रोडक्शनची सुरवात

      नमस्कार, ‘चला शिकूया 3D Animation’ सिरीजच्या या तिसऱ्या खंडात, मी महेश देशपांडे, आपलं स्वागत करतो. कम्प्युटर ग्राफिक्स आणि 3D Animation बद्दल गप्पा मारत मारत आता आपण आपल्या ‘टिंगू’ शॉर्ट-फिल्मच्या खऱ्या-खुऱ्या प्रोडक्शनला सुरवात करत आहोत. या तिसऱ्या व्हॉल्यूम-मध्ये मी तुम्हाला आपल्या शॉर्ट-फिल्मच्या एकूण कामाची माहिती करून देणार आहे. आपण आत्ता पर्यंत जे काही शिकलो आहोत, त्यातल्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष software मध्ये करून बघणार आहोत.

      या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला अनेक फाइल्स डाउनलोड करण्यासाठी देणार आहे. अशा फाइल्स तुमच्या कम्प्युटरवर उघडून तुम्ही त्यांचा अभ्यास करू शकाल. शिवाय तसं स्वतः करून बघू शकाल. या संपूर्ण व्हॉल्यूम 3 चा गोषवारा घ्यायचा झाला तर तो असा:

      आपल्या कामाचं स्वरूप आणि एकंदर डिझाईन आपण मागच्या production design च्या काही भागात बघितलं होतं. त्यात केलेल्या याद्यांप्रमाणे आपण सगळ्या प्रक्रियेतून पुढे जाणार आहोत.

      अर्थातच सुरवातीला आपण production मधल्या modeling च्या टप्प्यात काम करू. आपल्या फिल्म मधल्या काही 3D models ची अगदी सुरवातीपासून तयार करण्याची पद्धत आपण बघणार आहोत. त्यानुसार तुम्हीही ब्लेण्डरमध्ये तसं तयार करू शकाल. त्यातली काही मॉडेल्स बनवायला थोडीशी अवघड आहेत. ती कशी केली जातात ते आपण बघणार आहोत. पण अशी मॉडेल्स तयार करणं, या शिकण्याच्या टप्प्यात तुम्हाला शक्य होणार नाही. म्हणून मी तुम्हाला थेट तयार स्थितीत ती डाउनलोड करायला देणार आहे. मॉडेल्स तयार झाल्यावर पुढे त्याचं रंगकाम, त्यांच्या सरफेसवरचं Texture कसं तयार करायचं ते बघणार आहोत. ज्यामुळे ही मॉडेल्स खऱ्यासारखी दिसायला मदत होईल. शिवाय काही मॉडेल्सचं animation करण्यासाठी आपण त्यांच्या rigging चाही अभ्यास करणार आहोत.

      अशाप्रकारे एकदा सगळी मॉडेल्स तुमच्याकडे तयार झाली की आपण ती एकत्र करून त्यांचा ‘सेट’ उभा करणार आहोत. आणि याच सेटवर आपल्या फिल्मचं शुटींग होणार आहे. म्हणजे या सेटवर आपण animation करणार आहोत. याच मुख्य सेटमध्ये आपण लाइट्स आणि इतर सेटिंग करणार आहोत. एकदा असा सेट तयार झाला की मग त्यात आपण शॉट बाय शॉट animation करू. म्हणजे प्रत्येक शॉटच्या गरजेप्रमाणे त्यातल्या वेगवेगळ्या मॉडेल्सचं आणि कॅमेऱ्याचं animation करू. हा या संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात भन्नाट आणि महत्वाचा टप्पा असणार आहे. त्याचं animation तुम्ही स्वतः कराल तेंव्हा तुम्हाला खूप मजा येणार आहे. आपली मॉडेल्स आणि त्यातल्यात्यात टिंगू जेंव्हा हलायला लागेल तेंव्हा बघा कशी धमाल येते ते!

      सगळ्या शॉट्सचं animation झाल्यावर त्यांचं रेंडरींग कसं करायचं ते आपण बघणार आहोत. या टप्प्यात आपण केलेलं animation एकदम खऱ्यासारखं दिसायला लागेल. रेंडरींग मध्ये कम्प्युटरला प्रत्येक फ्रेमची चित्रं तयार करायला लागतात ते आपण आधी बघितलंच आहे. हा टप्पा खूप वेळखाऊ असतो. सर्वसाधारण कम्प्युटरला सगळे शॉट्स रेंडर करायला तासंतास लागतात. त्यामुळे काही शॉट्सचं सेटिंग दाखवून मी तुम्हाला थेट रेंडर झालेले तयार शॉट देईन. म्हणजे इथेही तुमचा वेळ वाचेल.

      अशा रेंडर झालेल्या शॉट्सचं पुढे आपण कम्पोझिटिंग आणि एडिटींग करणार आहोत. शेवटचा हात म्हणून रंगसंगती आणि इतर बारीकसारीक बदल करणार आहोत. याच टप्यात आपण काही स्पेशल इफेक्ट्सही वापरणार आहोत. आणि या सगळ्या व्हिडिओजच्या जोडीला काही आवाजही मिक्स करणार आहोत.

      अशा सगळ्या टप्प्यातून गेल्यावर तुमच्याकडे असेल आपल्या टिंगूची छानशी फिल्म! याचीच तर आपण सगळे आतुरतेने वाट बघतोय, हो ना? आणि इथेच न थांबता आम्ही आणखी पुढे जाणार आहोत. मी आणि आमच्या अद्वैत स्टुडिओजची टीम या शॉर्ट-फिल्मचं काम असंच पुढे नेऊन आणखी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लेखमालिके नंतर व्हिडिओ ट्रेनिंगच्या माध्यमातनं मी ते आपल्यापर्यंत आणखी चांगल्याप्रकारे आणणार आहे. शिवाय आपल्या काही विशिष्ट शंका किंवा प्रश्न असतील तर त्यासुद्धा सविस्तर भागातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

      तेंव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात, नमस्कार!

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.