Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
08
Jul

C06- मॉडेलिंग- Rubick’s cube

आपण मागच्या भागात बघितलेले नवीन शॉर्ट-कट्स तुम्ही नक्कीच वापरून बघितले असतील.

Q: हो, मी थोडा प्रयत्न करून बघितल्यावर लगेच समजायला लागलं. ब्लेंडर वापरायला खूप सोपं वाटलं. आता पुढे काय बघायचंय?

आता आपण एक छोटं मॉडेल करून बघू. आपण ‘रूबिक्स क्यूब’ तयार करू. आपल्या फिल्मसाठी तर ते लागणारच आहे.

Q: मला असं वाटतं की ब्लेंडर मधला साधा क्यूब 3 x 3 x 3 असा कॉपि करून ठेवला की हा ‘रूबिक्स क्यूब’ तयार होईल. बरोबर ना?

अरे वा! तुम्हाला तर आधीच लक्षात आलं की. तुम्हाला पुढचं मॉडेल तयार करणं खूपच सोप्पं जाईल. याच मॉडेलच्या निमित्तानी ब्लेंडरमधल्या पुढच्या एका प्रकाराची आपण ओळख करणार आहोत. या प्रकाराला म्हणतात ‘Modifier’ (मॉडिफायर). नावाप्रमाणेच मूळ ऑब्जेक्टला वेगवेगळ्या प्रकारानी मॉडिफाय करण्याचं (म्हणजे बदलण्याचं) काम हे Modifiers करतात.

Q: अच्छा. पण मला नीट नाही कळलं, थोडं समजावून सांगू शकाल का?

समजावून सांगण्यापेक्षा, आत्ता आपण थेट एका Modifier चा वापर करू. म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल. आणि मग आपण Modifiers बद्दल सविस्तर बोलू.

ब्लेंडरमधल्या एका खास सेक्शन मार्फत आपण हे modifiers वापरू शकतो. ‘3D view’ च्या उजवीकडे आणि ‘outliner’ च्या खाली जो मोठा उभा ‘property panel’ आहे त्याची आपण मागे थोडक्यात ओळख केलीच आहे. हा panel तुम्हाला अनेक छोट्या भागांचा बनलेला दिसेल. Modifiers वापरण्यासाठी आता आपण थेट त्याच्या सेक्शन मध्ये जाऊया. आपण ब्लेंडरमधल्या नेहमीच्या क्यूबला एक modifiers देऊ.

क्यूब सिलेक्ट करा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे  ‘property panel’ मधल्या  ‘Modifiers’ च्या बटनावर क्लिक करा. हा सेक्शन म्हणजेच Modifiers सेक्शन किंवा Modifiers panel. इथे तुम्हाला पहिल्यांदा ‘Cube’ असं नाव दिसेल आणि त्याच्या खाली एक ‘Add Modifier’ असं बटन दिसेल. आता या बटनावर क्लिक करा. म्हणजे त्यात चार मोठ्या याद्या दिसतील. आपण सध्या फार खोलात जायला नको. त्यामुळे तुम्ही सध्या थेट दुसऱ्या म्हणजे ‘Generate’ नावाच्या यादीकडे लक्ष द्या. त्यात तुम्हाला वरून दुसऱ्या जागी ‘Bevel’ (बिव्हेल) असं नाव दिसेल. त्याच्यावर क्लिक करा.

म्हणजे ती यादी जाऊन तिथे ‘bevel’ चे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. याशिवाय 3D viewport मध्ये क्यूब थोडा वेगळा दिसेल. त्याच्या कडा बघा.

CS3D-C06A-Modifire-Bevel

Q: हो त्या आता थोड्या चपट्या झाल्यासारख्या दिसतायत. जणू त्यांची कड बोथट झालीये.

यालाच ‘beveling’ म्हणतात. आणि हा ‘bevel’ मॉडिफायर बरोबर तेच काम करतो. असे आणखी खूप modifiers आहेत आणि प्रत्येकात भरपूर ऑप्शन्स आहेत पण या भागात आपण त्याबद्दल नको बोलायला. सध्या आपण रुबिक्स क्यूब बनवू.

आता या bevel केलेल्या क्यूबच्या कॉपी करून आजूबाजूला ठेवल्या की पूर्ण रुबिक्स क्यूब तयार होईल. मागे आपण object ला Duplicate कसं करायचं आणि मूव्ह किंवा रोटेट कसं करायचं ते बघितलं होतं.

Q: हो. move साठी ‘G’, Rotate साठी ‘R’ आणि scale साठी ‘S’, एखाद्या axis मध्ये move करायचं असेल तर X, Y किंवा Z दाबायचं. आणि Duplicate करण्यासाठी ‘Shift+D’ दाबायचं!

हं, एकदम पाठ झालंय की. यातलीच आणखी एक पुढची पायरी म्हणजे X, Y किंवा Z नंतर किती अंतर मूव्ह करायचं तो आकडा टाईप करायचा. उदाहरण म्हणजे आपल्याला समजा हा क्यूब X axis मध्ये 5 मी नी हलवायचा असेल तर असं टाइप करायचं
G  X  5

आणि उलट्या दिशेला नेण्यासाठी
G  X  -5

आपल्या bevel दिलेला क्यूब 2m चा आहे. हे तुम्ही viewport च्या ‘N panel’ मध्ये Dimensions भागात बघू शकता. म्हणजे याची कॉपी केल्यानंतर ती आपल्याला 2m नी सरकवायला लागेल. सुरवातीला आपण Y दिशेला मूव्ह करून बघू.

पहिली कॉपी करण्यासाठी क्यूब सिलेक्टेड असतानाच ‘Shift+D’ दाबा. यामुळे कॉपी तयार होईल आणि आपोआप मूव्ह टुलहि चालू होईल. आपल्याला Y axis मध्ये 2m हवं असल्यामुळे लगेच ‘Y 2’ असं टाइप करा. तुम्हाला शेजारी क्यूबची कॉपी आलेली दिसेल.

आणखी एक कॉपी करण्यासाठी पुन्हा पहिल्या क्यूबवर right click करा, म्हणजे तो सिलेक्ट होईल.

आता मगाच प्रमाणे डाव्या बाजूला कॉपी करू

‘Shift+D , Y  -2’

CS3D-C06B-Copy-Y

झाल्या आपल्या पहिल्या तीन कॉपी तयार. या तीन objects ना एकदम सिलेक्ट करून त्यांची एकत्र कॉपी केली तर आणखी पटकन काम होईल. त्यांना एकत्र सिलेक्ट करण्यासाठी shift+right click करा. आणि X axis मध्ये duplicate करण्यासाठी…

Q: shift+D X 2, बरोबर?

बरोबर! आणि मागच्या बाजूसाठी -2.

CS3D-C06C-Copy-X

हे झाले आपले खालचे नऊ क्यूब. आता या सगळ्यांना shift select केलं आणि त्यांच्या दोन वेळा Duplicate केल्या की झालं.

Q: आता वर म्हणजे Z axis. म्हणजे ‘shift+D Z 2’

CS3D-C06D-Copy-Z

हो, झाला आपला रुबिक्स क्यूब तयार! तुम्ही त्याला वेगवेगळ्या बाजूनी नीट फिरवून बघा.

CS3D-C06E-Cube-View

Q: अरे वा. मला वाटतं या bevel modifier मूळे तो आणखीनच नीट दिसतोय. मला तर पुढे आणखी काय काय आहे त्याची खूप उत्सुकता आहे.

पुढच्या वेळेला आपण थोडं आणखी पुढे जाऊ आणि जर वेगळ्या पद्धतीचं मॉडेलिंग बघू… तेंव्हा पुन्हा भेटू पुढच्या भागात …

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.