Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
23
Sep

C16- टिंगू- लाईटिंग

लाईट्स हे रेंडरींगला जिवंतपणा आणण्यासाठी खूप महत्वाचं असतं. आधी आपण लाईट्सची थोडी ओळख करून घेतलीच आहे. या भागात आपण पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून लाईट्स समजावून घेऊ. आणि आपल्या मुख्य सेटमध्ये लाइटिंग कसं करता येईल ते बघू.

सुरवातीला आपण ब्लेंडर मधल्या सगळ्यात सोप्या लाईटच्या प्रकारची ओळख करून घेऊ. याचं नाव आहे- ‘Point light’. नावाप्रमाणेच हा लाईट म्हणजे एका सूक्ष्म बिंदूतून सगळ्या दिशांना प्रकाश पडणारा लाईट. हा लाईट कसा वापरायचा ते बघू.

ब्लेंडर मध्ये या ‘पॉइण्ट लाईट’ शिवाय आणखी काही प्रकारचे लाईट आहेत. उदा. ‘Sun, spot, hemi आणि area’. प्रत्येकाच्या प्रकारानुसार ब्लेंडर मध्ये आपल्याला वेगवेगळी सेटिंग उपलब्ध होतात. प्रकाशाची तीव्रता (Intensity), रंग आणि सावल्या इत्यादी अनेक बाबतीत प्रत्येक प्रकारचे लाईट वेगवेगळा परिणाम करतात. त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार त्यांचा वापर करू शकतो. या इतर प्रकारच्या लाईट्स बद्दल थोडी माहिती घेऊया.

हे सगळे प्रकार तुम्ही वापरून बघा आणि त्यांची intensity, colour किंवा shadow इत्यादी वेगवेगळी सेटिंग्स बदलून वेगवेगळे इफेक्ट्स आणण्याचा प्रयत्न करून बघा. आता हे लाईट कसे हाताळायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण आता पुढे जाऊ आणि आपल्या मुख्य सेट मध्ये हे वेगवेगळे लाईट्स कसे वापरता येतील ते बघू.

अशा प्रकारे आपण आपल्या सेटमध्ये लाईटिंग केल्यावर त्याचं रूप एकदम बदलून जातं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही बदल नक्की करून बघा. काही चुकलं तरी काळजी करू नका. मी शेवटी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक तयार ब्लेंडर फाईल देणार आहे.

आतापर्यंत आपण केलेलं सगळं लाईटिंग हा या सेटमधलाच एक भाग आहे. शिवाय हे सगळे लाईट्स स्थिर आहेत. पण एक लाइट असा आहे जो या सेटचा भागतर आहे पण तो स्थिर नसणार आहे. तो सतत हलणारा लाईट आहे. कोणता? येतंय लक्षात?

Q: चंद्र? पण तो तर आपण स्थिर आहे असंच समजू शकतो. कारण आपल्या गोष्टीत तो हलण्याची काहीच आवश्यकता नाही.

तो हलणारा लाईट म्हणजे साक्षात आपल्या फिल्मचा हिरो. ‘टिंगू’. विसरलात का? तो स्वतः एक ‘table-lamp’ आहे ते?

Q: खरंच की. त्याच्यात एक लाईट असणारंच की.

हं, आणि तो अर्थातच ‘spot light’ प्रकारचा असेल. शिवाय तो आपण टिंगूच्या ‘डोक्याला’ जोडला की टिंगूबरोबर हलेल सुद्धा. आणि त्यामुळे आजूबाजूच्या प्रकाशात टिंगूच्या हालचाली प्रमाणे तसे बदल होताना दिसतील. नाही का?
पुढच्या व्हिडिओमधे आपण हा टिंगूचा लाईट कसा सेट करायचा ते बघू. शिवाय यातच सुरवातीला आपण आणखी एक लाईट वापरून टिंगूमूळे खोलीत पडणारा एकंदर उजेड आणखी चांगला कसा दिसेल ते बघू.

सगळं लाईटिंग झाल्यावर अर्थातच आपल्याला रेंडरींग करून बघावं लागेल. मग आता आपण एक camera वापरून त्यातून दिसणारं दृश्य रेंडर करून बघू.

तुम्ही असं रेंडरींग करताना तुमच्या कम्प्युटरच्या ताकदीनुसार कमी-अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला रेंडरींग होऊन तयार झालेली इमेज आता दाखवतो.

तुमच्या लाईटिंगच्या सेटिंगनुसार तुम्ही रेंडर केलेली इमेज यापेक्षा वेगळी असू शकेल. पण काही हरकत नाही. आधी सांगितल्या प्रमाणे मी आता तुम्हाला एक ब्लेंडरची फाईलच देतो. ती डाउनलोड करून तुम्ही नक्की उघडून बघा. शिवाय मी आणखी काही सेटिंग्स त्यात आधीच केलेली आहेत, जी तुम्हाला लगेच नाही समजली तरी चालेल पण रेंडरींग थोडं चांगलं दिसेल.

तुम्ही या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.

 

पुढच्या भागात एखाद्या शॉटचं खरं-खुरं animation करणार आहोत. त्यामुळे पुन्हा भेटायला विसरू नका.

< Back

Index

Next >

 

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.